Thursday, September 29, 2011

नवरात्रीची आरती


नवरात्रीची आरती

आश्‍विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।।
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी ।।उदो।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।उदो।।

चतुर्थीच्या दिवशी विश्‍वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ।।उदो।।

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।।उदो।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी ।।उदो।।

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।उदो।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्‌भक्ती करूनी हो ।।
षड्‌सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो।।उदो।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो ।।
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो।।उदो।।
 

No comments:

Post a Comment