श्री क्षेत्र माहूरगड एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ते ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. शके 1697मध्ये लिहिल्या गेलेल्या 'श्री रेणुका महात्म्यम्' या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.
श्री क्षेत्र माहूरगड हे यज्ञकुंडातून प्रगटलेल्या एकविरा देवमाता अदिती साक्षात लज्जागौरी श्री रेणुकेचे पावन क्षेत्र आहे.
सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक,ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गदेवतेने प्रगट होऊन आपल्या मुक्त हाताने शुचिर्भूत सौंदर्य आणि मांगल्याने निर्माण केलेला हा कोऱ्या भूमीचा प्रदेश आहे.
देव, सिद्ध, ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती. त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्वाकू नावाचा राजा होता व इश्वाकू राजाच्या सद्गुणी मुलाचे नाव होते रेणू. रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली.शंकर-पार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला.
त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रबिंबाप्रमाणे कन्या प्रगटली. तीच एकविरा.अदिती म्हणजेच श्री रेणुका. दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता रेणुका यज्ञकुंडातून प्रगटली असा ग्रंथात उल्लेख आहे. यथावकाश रेणुकेचे स्वयंवर झाले तितकाच तेजस्वी आणि तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. जमदग्नीची कथा अशी आहे, की ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू व भृगू आणि पौलोमी यांच्यापासून च्यवन भार्गव झाला.
ब्रह्मदेवाच्या कृपेने च्यवन भार्गवाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेला रुचिक नावाचा पुत्र झाला. रुचिक आणि सत्यवतीचा पुत्र म्हणजेच भृगुकुलोत्पन्न जमदग्नी होय. भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले. जमदग्नी आणि रेणुका दोघेही पती- पत्नी म्हणून भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले.
सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू, कल्पतरू; तसेच दिव्य चिंतामणी,परीस व सिद्धपादुका सोबत होत्या. जमदग्नीला रेणुकेपासून वसू, विश्वासू,बृहद्भानू, बृहत्कन्न आणि विष्णुस्वरूप महापराक्रमी परशुराम ही पुत्रे झाली.परशुरामाचा जन्म निशा उजळली असताना, अदिती नक्षत्रावर वैशाख महिन्याच्या तृतीयेला प्रथम प्रहरी सहा ग्रह उंचीचे असताना चंद्र, राहू, संगत मिथुनेचा असताना राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतला. परशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला.
रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे "लज्जागौरी'चे. जेव्हा रेणुकामाता रजस्वाला झाली असताना, चौथ्या दिवशी स्नानाला नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्यासमोर द्यावी, असा आग्रह धरतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलावितात व त्यास आज्ञा करतात, तुझी आई रेणुका भागीरथी नदीवर स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामूक भावनेने पाहिले. तेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी व दुष्ट रेणुकेला तत्काळ ठार कर. पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात.
पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात.जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात.
या ठिकाणी रेणुकेचे "लज्जागौरी' हे रूप प्रगट होते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात अनुष्ठुप छंदामध्ये एक श्लोक आहे, तो असा- "या देवी सर्व भुतेषू लज्जारूपेन संस्थीतः नमस्तस्यै नमस्तसै नमस्तस्यै नमो नमः' या ठिकाणी तिची पती भक्तिपरायणता लक्षात येते. रेणुकेस पती असूनसुद्धा तिच्या मनात परपुरुषाला पाहून कामविकार निर्माण होतो. तिला लज्जेचे महत्त्व असल्याने रेणुका तितक्याच धीराने आपल्या पतीने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारते.
आज समाजामध्ये झालेले नैतिक अधःपतन पाहता सामाजिक व्यभिचार व संस्कृतीच्या नावाखाली विकृती जोपासणाऱ्या स्त्रीत्वाच्या तेजाचा व शक्तीचा विसर पडलेल्या त्या निर्लज्ज स्त्री, पुरुषांच्या डोळ्यांत घालण्यासाठी लज्जागौरी रेणुकेचे हे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन नव्हे काय?
वरील घटनेने जमदग्नीच्या मनात क्रोधाबद्दल उद्वेग उत्पन्न होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागतात. दुसऱ्या वेळेस जेव्हा महिस्मावतीनगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार खेळत सैन्यासह जमदग्नी आश्रमासमीप येतो. पूर्वी त्याने नारदाकडून या आश्रमाची ख्याती ऐकलेली असते तेव्हा रेणुका व जमदग्नी सहस्त्रार्जुनास आश्रमात भोजनास बोलावितात.
आपल्या सैन्यासह सहस्त्रार्जुन ते निमंत्रण स्वीकारतो; पण आश्रमात जमदग्नी व रेणुका हे दोघेच असताना, आपले व सैन्याचे आदरातिथ्य कसे करतील याची माहिती जेव्हा तो आपल्या गुप्तचरामार्फत घेतो तेव्हा त्याला कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; पण जेव्हा रेणुका व जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात तेव्हा जो जमदग्नीवर तलवारीने वार करतो.
रेणुका पतीच्या संरक्षणासाठी धावून जाते. क्रोधाचा त्याग केल्यामुळे जमदग्नी आपले, रेणुकेचे व कामधेनूचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. यामध्ये जमदग्नी ठार होतात. वरील जमदग्नीचे क्रोधसहित व क्रोधविरहित रूप पाहता फार मोठा संदेश श्री रेणुकेच्या महात्म्यामुळे समाजजीवनाला मिळतो आणि तो म्हणजे पहिल्या वेळेस क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे व दुसऱ्या वेळेस क्रोधाचा मुळीच उपयोग न केल्यामुळे जमदग्नीवर मोठी आपत्ती कोसळते.
जमदग्नी पत्नी रेणुका व पुत्रांना गमावून बसतात. क्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही जीवनयात्रा सफल करणे व आत्म्याचा विकास करणे यांसाठी उपयोग होतो. त्यात ज्याला संतुलन राखता येईल, सुवर्ण मध्य साधता येईल त्याचे जीवन दोन्ही दृष्टींने यशस्वी होते.एवढे होऊनसुद्धा रेणुका आपल्या पतीबद्दल व पुत्रांबद्दल तक्रार करीत नाही. या ठिकाणी रेणुकेची क्षमाशीलता हेसुद्धा लक्षात येते.
जेव्हा कैलासात परशुरामास कळते, की आई रेणुकेवर सहस्त्रार्जुनाने गंभीर एकवीस वार केल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि पिता जमदग्नीचा त्याने वध केला आहे. तेव्हा आईची हाक ऐकून परशुराम आश्रमात येतो व तिथे प्रतिज्ञा करतो, की आई सहस्त्रार्जुनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुला स्नान घालील व एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय करीन. तेव्हा रेणुका पुत्रांस यशस्वितेचा आशीर्वाद देते व म्हणते, प्रथम आम्हा उभयतांची व्यवस्था कर.
जमदग्नीच्या अग्निक्रियेसाठी जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन चल.जमदग्नीची अग्रिक्रिया श्री दत्तात्रेयाच्या पौरोहित्याखाली रेणुकेच्या सांगण्यावरून परशुरामाने मातृतीर्थास केली तेव्हापासून जगन्माता रेणुकेचा जिथे वास आहे, तेच श्री क्षेत्र माहूरगड.
अखिल भारतात शक्तीची जी 51 मूळ पिठे आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी होय.
जगन्माता रेणुका हे असेच जन्मातेचे एकरूप आहे. वरील विश्लेषणावरून लिंगपूजा व देवीची उपासना आर्यांच्या आधीही सिंधू संस्कृतीत चालत आल्यामुळे देवीची शक्तिपीठे व रेणुका ही अनार्य देवता आहे, हे लक्षात येते.
रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे. विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे. अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे.

No comments:
Post a Comment